औरंगाबादेत शिक्षण घेत असताना, अवघ्या 18 वर्षांच्या अनंताने क्रांतिकार्याची शपथ घेतली. सामान्य जनतेचा छळ करणारा नाशिकचा क्रूर इंग्रज अधिकारी जॅक्सनचा वध केला. अतिशय नाट्यमय पद्धतीने अनंताने त्या अधिकाऱ्याला मारले.आज आपण क्रांतिकारी अनंत कान्हेरे यांच्या जीवनातील एक थरारक घटना जाणून घेणार आहोत.
अनंत यांचा जन्म कोकणात झाला. माध्यमिक शिक्षणासाठी अनंत औरंगाबादेत दाखल झाला. त्याला तेथेच देशप्रेमाचे प्रेम जडले. तेथे तो क्रांतिकारी चळवळीत सहभागी होऊ लागला. एकदा सावरकरांनी लंडनहून एक पिस्तूल पाठविले. ते अनंताच्या हाती पडले. याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी जॅक्सन नावाचा क्रूर इंग्रज अधिकारी होता. तो सामान्य जनतेला फार छळत असे. त्या अधिकाऱ्याने खरे वकील,तांबेशास्त्री,बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना तुरुंगात धाडले होते.
जॅक्सनची मुंबईत बदली झाली होती, पण आता त्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यांचा वध करणे जरूरी होते, पण जर तो मुंबईत गेला तर ते शक्य होणार नव्हते. मग त्यांचा वध नाशिकांतच करायचा असे ठरले. यासाठी तरण्याबांड अनंत कान्हेरेची निवड करण्यात आली.
सावकरांनी पाठविलेल्या पिस्तुलाचा अनंताने सराव केला. जिल्हाधिकरी कार्यालयात जाऊन जॅक्सनला पाहून घेतले. जॅक्सनला मारल्या नंतर फाशी होणार हे अनंताला माहीत होते म्हणून त्याने त्यांच्या आई- वडिलांसाठी स्वताचे एक छायाचित्र देखील काढून घेतले.
वधाचा दिवस ठरला 21 डिसेंबर 1909. जॅक्सनची बदली झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात शारदा नाटकांचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. अनंत तेथे आधीच जाऊन बसला होता.जॅक्सन येताच अनंताने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
पहिली गोळी जॅक्सन काखेतून गेली, त्या नंतर अनंत जॅक्सनच्या समोर उभा राहिला आणि त्याला सलग चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंत शांतपणे पोलिसांच्या हवाली स्वाधीन झाला. जॅक्सच्या हत्येच्या आरोपाखाली अवघ्या 18 वर्षांच्या अनंतला फाशीची शिक्षा झाली. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी अनंत कान्हेरे देशांसाठी शहीद झाले.