वर्धा जिल्ह्यातील सेलसूराजवळ 24 जानेवारीच्या रात्री झायलो कार नदीत कोसळली. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थी जागीच ठार झाले. यामध्ये भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचा देखील समावेश होता. विजय रहांगडाले गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत. आविष्कार रहांगडाले हा सांगवी मेघे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
आमदार विजय रहांगडाले यांनी मुलांच्या मृत्यु नंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं,आविष्कार आमचा हिरा आनंदाचा झरा, डॉक्टर नव्हते खमारी गावात, होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात, बापाचे स्वप्न पूर्ण करण्यास गेला होता आविष्कार डॉक्टर बनण्यास, लागली कुणाची नजर, आज दगडालाही फुटला पाझर,गेला तरुण वयात सोडून,केलेले सारे वादे तोडून, तुझी आई आजही वाट पाही,तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई, कसे समझवू तिला,तू परत येणार नाहीस, मुला कुठे हरवलास, पाखरा परत ये रे माझ्या लेकरा, गेलास आविष्कार आम्हाला सोडून, तुझ्यासाठी रंगविले सारे स्वप्न मोडून, आज आहे मातम सगळीकडे,आई -बाबा संगे सारा गाव रडे.
सोमवारी 24 जानेवारी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत विद्यार्थी सावंगी येथील मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे विद्यार्थी होते. ते यवतमाळहून वर्ध्याकडे परतताना हा अपघात झाला. या पैकी 6 विद्यार्थी हे सावंगी मेघे हॉस्टेल राहणारे होते.
यातील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बाहेर गेले होते. अशी माहिती मेघे मेडिकल कॉलेजचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय मेघे यांनी दिली. मेघे म्हणाले मुलं वाढदिवस साजरा करू लवकर येऊ अशी माहिती त्या मुलांनी दिली होती. पण ते वेळेत न आल्यामुळे आम्ही त्यांच्या पालकांना कळविले.
आम्हाला रात्री 2.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.त्यांनी मृत पावलेल्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत , तर जखमीना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. खासदार रामदास तडस यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.