Home » पोटाची खळगी भरण्यासाठी हे गावकरी रोज मरणाला जवळ करत आहेत..
Articles काय चाललंय? खास तुमच्यासाठी!

पोटाची खळगी भरण्यासाठी हे गावकरी रोज मरणाला जवळ करत आहेत..


भारतातील एक प्रगत राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. देशांत नंबर होण्याच्या रेसमध्ये आपलं राज्य अग्रेसर असतं ते असायला देखील हवं, पण एकीकडे आपण नंबर एकच्या गप्पा मारतो, मेट्रो आणतो, स्मार्ट सिटी उभा करत आहोत पण महाराष्ट्रात असलेल्या असंख्य खेड्यांचं काय? आता हेच पहा ना,कल्याण, डोंबिवली, ठाणे या शहरांमध्ये अनेक मोठे प्रकल्प उभे केले जात आहेत.

मात्र या शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आपटी गावातील लोक मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मरणाला जवळ करत आहेत. उल्हास नदीच्या अगदी काठावर हे आपटी गाव वसलेलं आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हे गावकरी आपला जीव तारेवर ठेवत प्रवास करत आहेत.

हा प्रवास जर तुम्ही पाहिला तर तुमच्या देखील अंगावर काटे येतील.उल्हास नदीवर लोखंडी खांब आहेत, त्यावर पाय ठेवून येथील नागरिक नदी पार करतात.लोखंडी खांबावरुन जाताना थोडा जरी तोल गेला तर लगेच नदीत वाहून जाण्याची शक्यता आहे. आपटी, बारे, मांजली, दहगाव,वाहोली, या सर्व भागात आधी सर्व लोक शेती करत पण आजूबाजूला एमआयडीसी झाल्याने रोजगारांसाठी नागरिक बाहेर पडू लागले.

आजूबाजूच्या शहरांची लोकसंख्या वाढू लागली. त्यामुळे त्यांची पाण्याची गरज देखील वाढली, ती गरज भागविण्यासाठी आपटी येथील बंधाऱ्यांची ऊंची वाढविली गेली, त्यामुळे जी पायवाट होती ती पाण्याखाली गेली. गेली दोन वर्ष झाली ही पायवाट पाण्याखाली गेली. त्यामुळे नागरिकांना आता जीव मुठीत धरून पाण्यातून जावे लागत आहे. दुसऱ्या मार्गाने जाता येते पण हे अंतर 25 -30 किलोमीटर इतके जास्त आहे.

पेट्रोल- डिझेलचे वाढलेले दर यामुळे हे 25-30 किलोमीटर अंतर रोज पार करणे परवडणारे नाही.त्यामुळे आता लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत