आई म्हणजेच पृथ्वीवरील देवच, आई मुलांसाठी सर्वस्व असते, अनेक स्त्रीया त्यांच्या मुलांसाठी त्यांचे करियर देखील पणाला लावतात, पण काहीना मात्र हे आईचपणच एक वेगळी ताकद देतं. ही यशोगाथा आहे, नाशिक पंचवटी येथील निवासी विजया पवार यांची. विजय पवार या पोलिस उपनिरीक्षक आहेत. लग्नानंतर दोन मुले झाल्यानंतर विजया यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
विजया सांगतात 2005 मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी मी केवळ 11 वर्षांची होती. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता, पण माझी आई मोठ्या हिंमतीने उभी राहिली. लवकर आणि उत्तम नोकरी मिळावी म्हणून डी.एड केले, पण भरती बंद झाली.
आईने त्या नंतर लग्न लावून दिले. तेव्हा नुकतचं शिक्षण पूर्ण झाले होते. पती आरोग्य विभागात कामाला होते. पती नंदुरबारला होते, लग्नानंतर दोन मुलं झाली पण माझ्यातील काहीतरी करण्याची जिद्द मला शांत बसू देत नव्हती.
अखेर एमपीएसी करण्याचा निर्णय घेतला. मुलांना माझ्या आईकडे नाशिकला ठेवले आणि अभ्यास सुरू केला. ना कोणते क्लास, ना कोणाचे मार्गदर्शन स्वता अभ्यास करून पीएसआयची परीक्षा पास केली. या परीक्षेत लहान बहीण देखील पास झाली. आम्ही तिघी बहिणी आहोत. तिसरी बहीण देखील सरकारी शाळेत शिक्षिका आहे, अशा प्रकारे आम्ही तिन्ही मुली सरकारी नोकरीत कामाला लागलो. आईचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं.
या यशामध्ये सासरच्या लोकांचा देखील तितकाच मोठा वाटा आहे, दहा वर्षांचा मुलगा आणि लहान मुलगी याचा देखील तितकाच वाटा आहे, असे विजया आवर्जून सांगतात. पती आणि आईचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद फार मोठा आहे. विजया यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.