Home » भांडणाला कंटाळून आजोबांनी अपमान करायला पहिल्यांदा पुणेरी पाटीचा शोध लावला
खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

भांडणाला कंटाळून आजोबांनी अपमान करायला पहिल्यांदा पुणेरी पाटीचा शोध लावला

किमान शब्दांत कमाल अपमान ही पुणेकरांची खास ओळख आहेत. सरळ बोलतील ते पुणेकर कसले. जगात पुणे खास दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. ज्ञान देणाऱ्या अनेक उत्तम संस्था आणि कॉलेजस पुण्यात आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे पुणेरी पाट्या. अगदी मोजक्या शब्दांत माहिती देण्यासाठी पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेत. जेव्हा जेव्हा पुणेरी पाट्या आपण पाहतो तेव्हा एक प्रश्न नेहमी मनात येतो, पुणेरी पाट्यांचा शोध कोणी बरं लावला असेल? पहिली पुणेरी पाटी काय असेल. आज आपण अशाच एका पुणेरी आजोबाविषयी जाणून घेणार आहोत , ज्यांनी पुणेरी पाट्या लावण्यास सुरुवात केली.

पुणेरी पाटीला मोठा इतिहास आहे. त्यावरून अनेक वाद देखील आहेत. पण एका व्यक्तीचे नाव मात्र पुणेरी पाट्यांसाठी आवर्जून घ्यावे लागते. तो व्यक्ती म्हणजे प्र.बा.जोग, म्हणजेच प्रभाकर बाळकृष्ण जोग होयं. आता तुम्ही म्हणाल हे जोग कोण होते तर पी जोग क्लासेस चे सुहास जोग, अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग यांचे वडील आणि अगदी अलीकडे बिग बॉस ह्या शोमुळे चर्चेत असलेल्या अभिनेता पुष्कर जोग यांचे आजोबा म्हणजे प्र.बा. जोग होयं.

जोग यांची इतकी ओळख पुरेसी नाही. त्यांची स्वताची देखील एक खास ओळख होती. ते क्रिकेटच्या सामन्याचे अंपायर, उत्तम वक्ते आणि राजकारणी देखील होते. पेशाने वकील आणि त्यात भांडणे हा त्यांचा आवडता छंद होता. भांडणे म्हणजे मारामाऱ्या नव्हे तर शब्दांचे खेळ. त्यांना भांडण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असायचे. त्यांनी या छंदावर मी हा असा भांडतो असे पुस्तक देखील लिहिले आहे.

त्यांची सारखी होणारी भांडणे टाळण्यासाठी त्यांनी स्वताच एक उपाय शोधून काढला. तो म्हणजे पाट्या लावण्याचा. घरच्या प्रवेश दारावरच त्यांनी पाट्या लावायला सुरुवात केली. या पाट्यांवर अगदी कमी शब्दांत अनेक सूचना लिहिलेल्या असायच्या. जसे की दुपारी बारा ते चार येऊ नये. पत्ता विचारू नये नाहीतर अपमान करण्यात येईल. अशा अनेक खुमाकदार पाट्या त्यांनी लावल्या होत्या. त्यांचे होणारे वाद, भांडणे कमी झाले पण त्यांच्या पाट्या संपूर्ण पुण्यात गाजल्या.

लोक त्या पाट्या वाचण्यासाठी गर्दी करत. त्यांच्या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकिली पुण्यात आणि मुंबईत चांगली चालायची. विधानसभा मात्र ते हरायचे पण नगरसेवक ते हमखास बनायचे. पुण्याचे दोनदा उपमहापौर पद त्यांनी भूषविले आहे. जोग यांची विशेषता म्हणजे निवडणुकीत त्यांनी जी आश्वासने दिली त्यांनी ती पूर्ण केली.

आजही पुण्यात आचार्य अत्रे यांच्या नंतर जोग यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ते प्रचंड हुशार होते. त्यांची शिस्त कडक होती. त्यांचा स्वभाव देखील फटकळ होता. पण ते अस्सल पुणेकर होते त्यामुळे ते आज देखील लक्षात आहेत. त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून इतर पुणेकर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. पुणेकरांना त्यांचा हा विक्षिप्तपणा फार आवडायचा त्यामुळे त्यांना पुणेरी पाट्यांचे आद्य जनक म्हटले जाते.