Home » स्वराज्याप्रती निष्ठा काय असते ते शिकवणाऱ्या हंबीरराव मोहितेंचा ज्वलंत इतिहास
खास किस्से

स्वराज्याप्रती निष्ठा काय असते ते शिकवणाऱ्या हंबीरराव मोहितेंचा ज्वलंत इतिहास

“परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट” असं वाक्य सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू आल्यावर अंगावर काटा येतो. त्याचवेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात हंबीररावांच्या आयुष्यातील असंख्य अडचणी आणि त्यावर त्यांनी धीर धरून केलेली मात. पण अनेकांना प्रश्न पडतो कि मग हंबीरराव नेमके कोण होते आणि त्यांचं आयुष्य काय होत? तेच तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडीओ न चुकवता शेवटपर्यंत पहा.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या कारकिर्दीत सरसेनापातीचा बहुमान मिळालेले एकमेव सेनापती म्हणजे हंबीरराव मोहिते होऊन गेलेत. जितका त्यांचा पराक्रम होता तेव्हढेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ठ सेनापती अशीच त्यांची ओळख आहे. छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीची आणि प्रशासनाची पूर्ण ओळख असलेला, गनिमी काव्यात पारंगत आणि प्रामाणिक योद्धा असे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

आपल्या स्वराज्यासाठी शहाणा आणि  सबुरीचा सेनापती असावा अशी शिवाजी महाराजांची इच्छा कायम होती. हंबीररावांच नाव हंसाजी मोहिते असं होतं. महाराजांच्या शंभर दिडशे सैन्याच्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यावेळी त्यांना सरसेनापती बनवल्याची माहिती इतिहासात मिळते. कऱ्हाडजवळील तळबीड येथील शौर्याची मोठी परंपरा असलेल्या मोहितेंच्या घराण्यात हंबीरराव यांचा जन्म झाला. हंबीरराव हे महाराणी ताराराणी यांचे वडील होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर युवराज, पंतप्रधान यांच्यासोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचादेखील  सन्मान झाला. पुढे त्यांच्याकडे सरनौबतपदाचे सर्व अधिकार सोपवण्यात आले असा उल्लेख आहे.

सरसेनापती झालेल्या हंबीरराव यांच्यामुळे स्वराज्याला अत्यंत भक्कम असा फायदा कायम होत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्याभिषेक झाल्यावर त्यांनी औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, बुऱ्हाणपूर या मुघलांच्या ताब्यातील प्रदेशात स्वारीची योजना तयार केली. मोहिमेत हंबीरराव देखील सोबत होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीने चकमा देऊन केलेल्या लुटीमुळे स्वराज्याच्या खजिन्यात तब्बल 1 कोटी रुपयांची वाढ झाली होती.

पुढे शिवरायांच्या मृत्यू झाल्यावर देखील हंबीरराव मोहितेंनी संभाजी राजेंची खंबीरपणे साथ कायम दिली. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे बंधू आणि राजाराम यांचे मामा होते पण स्वराज्यात दुही होऊ नये म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना साथ दिली. इथे त्यांची शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर असलेली निष्ठा कळून चुकते. आणि दुसरीकडे संभाजी महाराजांनी हंबीररावांना पुन्हा सरनौबत केले म्हणजेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांच्याही सैन्याचे नेतृत्व करण्याची संधी हंबीररावांना त्यावेळी मिळाली होती. संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाल्यावर देखील त्यांनी आपल्या खजिन्यात भर टाकण्यासाठी बुऱ्हानपूर लुटण्याची योजना आखली. संभाजी महाराजांनी या स्वारीचे नेतृत्व देखील हंबीरराव मोहितेंनाच दिले होते. बुऱ्हानपूरचा सुभेदार औरंगाबादला असल्याची संधी साधून हंबीररावांनी मोहीम फत्ते केली आणि लाखो रुपयांचा माल मिळवला होता.