सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे लोह पुरुष होय. पटेलांना लोह पुरुष ही उपाधी का दिली गेली होती, यांचे अनेक किस्से आहेत. पटेल हे ठाम विचारांचे खंबीर नेते होते. त्यांची निर्णय क्षमता फार उत्तम होती. पेशाने वकील असल्यामुळे ते सर्व नियम अगदी शिस्तीत पाळत. स्वातंत्र्यानंतर भारत अनेक तुकड्यामध्ये विभागला गेला होता. पटेलांनी एकसंध भारत केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पटेलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आज आपण पटेलांचा असा एक किस्सा जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पटेलांनी हैद्राबादच्या नवाबाला देखील सरळ केले होते.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक घराणी भारतात विलीन झाली. अनेक छोटी राज्ये अखंड भारतात समाविष्ट झाली. पण हैद्राबाद मात्र अखंड भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. त्यावेळी हैद्राबादचा जो नवाब होता त्याने भारतात विलीन होण्यास नकार दिला. तेव्हा या संदर्भात सरदार वल्लभ भाई पटेल यांनी एक मीटिंग घेतली. तेव्हा पटेल म्हणाले हैद्राबाद अखंड भारतासाठी पोटातील कॅन्सरप्रमाणे आहे. पोटातील कॅन्सर वाढत आहे, यावर योग्यवेळी उपचार होणे गरजेचे आहे. हैद्राबादसाठी आपण सर्जिकल ऑपरेशन करू. मीटिंगमध्ये अनेकांना पटेलांचा हा निर्णय पटला नाही. एका सेनाअध्यक्षाने या गोष्टीला विरोध दर्शविला. तो म्हणाला जर हा असा निर्णय घेतला तर मी राजीनामा देईल. त्या अधिकाऱ्याला वाटलं पटेल घाबरतील आणि निर्णय रद्द करतील, उलट पटेल यांनी लगेच त्या अधिकाऱ्याला प्रतिउत्तर दिले. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर खुशाल द्या, पण उद्या हैद्राबादवर सर्जिकल हल्ला होणार म्हणजे होणार. शेवटी सैन्याने हस्तक्षेप केला आणि हैद्राबाद भारतात विलीन झाले.
आधी कर्तव्य आणि मग कुटुंब – सरदार वल्लभभाई पटेल यांची पत्नी अतिशय आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते.11 जानेवारी 1909 रोजी पटेल यांच्या पत्नीची तब्येत जरा जास्तच होती , पण पटेल यांना कोर्टात जाणे खूप गरजेचे होते. कारण त्यांच्या अतिशय महत्वाच्या केसची आज सुनावणी होती. पटेल कोर्टात गेले, सुनावणी सुरू झाली. तेवढ्यात कोर्टातील एक शिपाई हातात एक तार घेऊन आला, त्या शिपायाने न्यायाधीश यांची परवानगी मागितली आणि पटेल यांच्या हातात ती तार दिली. पटेल यांनी ती तार वाचली आणि पुढे परत त्यांची बाजू मांडण्यास सुरुवात केली.
केसची सुनावणी झाली. न्यायाधीशांना ही गोष्ट समजली ते पटेलांना म्हणाले, तुमच्या पत्नीचे निधन झाले आहे, तुम्हाला ही वार्ता समजली तरी तुम्ही तुमच्या पक्षकाराची बाजू मांडत होता. पटेल म्हणाले माझ्या पत्नीचे निधन झाले मला दुख झाले, ती आता परत काही येणार नाही. पण माझा पक्षकार निर्दोष असून देखील तो शिक्षा भोगत आहे. हे मला पटणारे नाही त्यामुळे मी त्यांची बाजू पूर्ण मांडण्यासाठी थांबलो. पटेल अतिशय धाडसी होते. त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या आणि त्या यशस्वी देखील केल्या. पटेल पेशाने वकील होते. कायद्याचा त्यांना दांडगा अभ्यास होता. पाकिस्तानने जेव्हा जुनागड आमचा भाग आहे असे जाहीर केले होते तेव्हा पटेलांनी काश्मीर देखील भारताचे आहे हे ठणकावून सांगितले होते.