Home » दोघांनी पार्टनरशिप मध्ये सुरु केलेलं मराठी मासिक लोकांनी फुकटही घेतलं नव्हतं
आपलं राजकारण खास किस्से

दोघांनी पार्टनरशिप मध्ये सुरु केलेलं मराठी मासिक लोकांनी फुकटही घेतलं नव्हतं


शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील दोन महत्वाचे नेते. या दोन्ही नेत्याभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत असते. बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पण राजकरणापलीकडे मात्र बाळासाहेब आणि शरद पवार यांचे संबंध खूप चांगले होते.

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भागीदारीत एक व्यवसाय केला होता पण तो न चालल्यामुळे लगेच त्यांचा व्याप गुंडाळावा लागला होता. तो किस्सा असा आहे. 1960 साली बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्रात नोकरी करण्याचे सोडले. त्या नंतर त्यांची शरद पवार यांच्याशी मैत्री झाली.

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भागीदारीत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला. सुप्रसिद्ध टाइम्स मॅगझिनच्या धर्तीवर राजनीति नावाचं मासिक बाळासाहेब आणि शरद पवार यांनी काढायचं ठरवलं. या मासिकाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हे मासिक चालेल की नाही हे पाहण्यासाठी बाळासाहेब एक भगिनीकडे गेले, त्यांच्या अंगात येत असे. त्या अचूक भविष्य सांगतात, त्यांनी बाळासाहेब आणि शरद पवार यांना थेट सांगितले, मासिकाची एक ही प्रत बाजारात चालणार नाही. प्रत्यक्षात मासिक बाजारात आले, खरचं त्यांच्या मासिकाची एक ही प्रती विकली गेली नाही. अशा प्रकारे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची व्यवसायिक भागीदारी देखील चालू शकली नव्हती.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जेव्हा काढली, तेव्हा सेनेची पहिली सभा शिवाजी पार्कवर झाली होती, तेव्हा शरद पवार यांनी त्यांची सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यांवर बसून ऐकली होती. बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना खाजगी जीवनात शरद बाबू म्हणून हाक मारत पण राजकीय जीवनात त्यांच्यावर टीका करताना ते शरद पवार यांना मैदयाचं पोत म्हणून टीका करत. बाळासाहेबांनी शरद पवारांवर कितीही टीका केली तरी शरद पवार यांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली नाही.