Home » आज कट्टर दुश्मन असलेले सेना-भाजप, त्याकाळी एकत्र येण्याचं कारण समजून घ्या..
आपलं राजकारण

आज कट्टर दुश्मन असलेले सेना-भाजप, त्याकाळी एकत्र येण्याचं कारण समजून घ्या..

शिवसेना आणि भाजपा यांची ३० वर्षांची मैत्री होती, पण मागील निवडणुकीत ही मैत्री तुटली. तसं विचार केला तर सेना आणि भाजप सुरुवाती पासून कधीच एकत्र नव्हते.शिवसेनेचा मराठीचा मुद्दा होता, सेना त्या मुद्दयावर राजकारण करत होती, तर भाजपाचा मात्र आधीपासून हिंदुत्व हा मुद्दा होता.

गोष्टी १९७० -१९८० दरम्यानची आहे, सेनेची असलेली क्रेझ कमी होत होती. बाळासाहेबांनी इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीला पाठिंबा दिला, त्यामुळे सेनेची प्रतिमा खराब झाली होती. बाळासाहेबांना पेपर टायगर देखील म्हटलं जातं होत.

मराठीचा मुद्दा देखील जुना झाला होता. आता पुढे काय असा प्रश्न बाळासाहेब यांच्या समोर उभा राहिला होता, अगदी त्यावेळेसच फेब्रुवारी १९८४ मध्ये युकेमधील रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण झाले, हे अपहरण खंडणीसाठी केलं गेलं नव्हतं, हे अपहरण केलं गेलं होतं ते काश्मीर लिब्रेशन आर्मी या संघटनेने.

इंदिरा सरकारने त्या मारेकऱ्यांना अटक केली आणि फाशी देखील दिली पण बाळासाहेबांना यातून एक नवीन मुद्दा मिळाला, तो म्हणजे एका मराठी अधिकाऱ्याला मुस्लिम संघटनेने मारले. १९८८ मध्ये सामना जन्माला आला, सामनातून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. जून १९८९ मध्ये भाजपाने राम-जन्म भूमीचा मुद्दा उचलून धरण्याचे ठरविले. हा मुद्दा देशभरात पोहचवायचा तर सर्व राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घ्यायला हवे.

महाराष्ट्रातून शिवसेनेला सोबत घ्यायला हवे, असे मत प्रमोद महाजन यांनी व्यक्त केले. अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि आपले मुद्दे एकच आहेत, आपण एकत्र यायला हवे, असे स्पष्ट केले. १९९० साली भाजपा आणि सेना अशा प्रकारे एकत्र आले.