“मला अडीच वर्ष तुरूंगात डांबून ठेवलं तेव्हा कुठे होता मराठी माणूस? मी मराठी होतो ना? मग अडीच वर्ष आत का ठेवलं? आणि आता कोर्ट सांगत आहे की, त्यांनी काहीच नाही केलं”, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खंडणी आरोप करण्यात आलेले असून त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. समीर वानखेडे यांची बाजू घेणाऱ्या भाजपचे भुजबळांनी कान ओढले. वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली होती.
समीर वानखेडे यांच्या आई लाडाने त्याच्या वडिलांना दाऊद हाक मारायच्या, यावरही भुजबळांनी मिश्कील चिमटे घेतले आहेत. मी पहिल्यांदा असं ऐकलं असून, आमच्याकडे या प्रकारच्या हाका मारत नाही असा टोला त्यांनी लगावला. “या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का? वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन सरकारला फसवले आहे चौकशीतून सर्व समोर येईलच. नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टीं समोर आणत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा सत्याला नेहमीच पाठिंबा आहे” असे भुजबळ म्हणाले.
काय होतं रेडकरांचं पत्र ?
“आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमची अब्रु चव्हाट्यावर मांडली जात आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात एका स्त्रि च्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे.
एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचे किती खालचे स्तर आहे, हे बाळासाहेब नेहमी विचारातुन मांडत असतं. आज ते नाहीत; पण तुम्ही आहात. त्यांची सावली. मला आपल्याकडून न्याय अपेक्षीत आहे”. असे क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे.