महाराष्ट्र देशांच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण महाराष्ट्रात जे घडते त्यांची चर्चा संपूर्ण देशात होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मागील तीन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली.
त्या नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट महत्वपूर्ण मानली जाते. ममता यांच्या दौऱ्यातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे ममता यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली पण कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली नाही? त्यामुळे ममता कॉंग्रेसला बाजूला करत आहेत का? अशी चर्चा राजकारणात होत आहे.
ममता आता पश्चिम बंगाल पर्यत न राहता आता त्या संपूर्ण देशात त्यांच्या पक्षाचा विस्तार करत आहेत. यावरून त्यांची राजकीय महत्वआकांक्षा दिसून येते. ममता जेव्हा पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी उभ्या होत्या तेव्हा पवारांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
पवार पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता यांच्यासाठी सभा देखील घेणार होते, अशा चर्चाना उधाण आले होते पण पवार यांच्या आजारपणामुळे ते जाऊ शकले नाहीत. पण त्यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना आणि स्थानिक पक्षांना ममता यांना पाठिंबा द्या असे म्हटले होते.
भाजपाकडून तर पवारांवर थेट आरोप केला गेला की पवारांनी भाजपा विरोधी सर्व पक्षांना ममता यांना पाठिंबा द्यावा यासाठी भाग पाडले, त्यामुळेच भाजपाचा पराभव झाला. बंगालमधील ममतांच्या विजयात राजकारणारतील चाणक्य मानले जाणारे शरद पवार यांचा अदृश्य हात आहे असे म्हटले जात होते.
त्यामुळे शरद पवार आणि ममता यांची आजची भेट अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे ममता आणि शरद पवार यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण येणाऱ्या 2024 निवडणुका आणि त्यांची सर्व गणिते या जोडीवर अवलंबून आहेत.