समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे न्याय देण्याच आवाहन केलंय..
आधीही क्रांतीने, मी एक मराठी मुलगी असूनही माझ्याच महाराष्ट्रात मला धमकावल जात असल्याच म्हटल होत.
आता क्रांती रेडकर यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहून ट्विट केलय, आणि त्याद्वारे त्यांनी न्याय देण्याच आवाहन देखील केलंय.
त्या पत्रात क्रांती लिहितात,
“माननीय उद्धव ठाकरे साहेब.
लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले..कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं..तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे..लढते आहे..सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..
मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरं चारचौघात उधळली जातात..शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे.. विनोद करून ठेवला आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं..एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे..आज ते नाही पण, तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.
तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे..तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे..म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय..तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती”
माझ्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यातील सरकारने उचलावी अशी यापूर्वी क्रांतीने मागणी केलेली होती. माध्यमांशी बोलतांना त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवलेली आहे. ‘मी एक मराठी मुलगी आहे. जर मला काही झाली तर या मराठी जनतेला तुम्ही काय उत्तर देणार,’ असा वास्तविक सवाल त्यांनी उपस्थित केला होता.