Home » ..म्हणून बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी सगळे नेते एक झाले होते!
काय चाललंय? झाल कि व्हायरल!

..म्हणून बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी सगळे नेते एक झाले होते!

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे (bailgada sharyat). या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत केले जात आहे. राज्यांतील सर्वपक्षांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी इतके प्रयत्न का केले गेले हे आज आपण पाहणार आहोत.

ही शर्यत प्रचंड प्रतिष्ठेची मानली जाते. प्रत्येक गावात जत्रा भरते आणि त्या जत्रेत मुख्य आकर्षण असते ते बैलगाडी शर्यतीचे. पूर्वीच्या काळी लोक ज्या प्रमाणे शिकार करणे किंवा इतर छंद आवडीने जोपासत. तसेच ग्रामीण भागात बागायतदार आणि जमीनदार शेतकरी बैलगाडीच्या शर्यती लावणे असे छंद जोपासत.

जत्रेच्या वेळी शर्यतीत आपला बैल उतरविणे अतिशय मानाचे समजेल जात. बैलगाडी शर्यतीत भाग घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी वर्षभर बैलांची भरपुर काळजी घेतली जाते. त्याला चांगला खुराक दिला जातो. त्याला उत्तम प्रशिक्षण दिले जाते. बैल वर्षभर पोसल्यानंतर तो शर्यती उतरविला जातो. बैलगाडी शर्यतीसाठी खिल्लारी बैल वापरले जातात. या बैलांची किंमत लाखों रुपयांनमध्ये असते. जो बैल शर्यतीत उतरविला जातो, त्यांच्याकडून शक्यतो कष्टाची कामे करून घेतली जात नाहीत.

बैलगाडा शर्यत फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. केरळ, पंजाब, आंध्रप्रदेश या राज्यात देखील बैलगाडा शर्यत लावली जाते. महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट म्हणून ओळखले जाते. कर्नाटकात कंबाळा आणि तामीळनाडूत रेकला तर पंजाबमध्ये बैलदा असे म्हटले जाते. घरात मलल व दारात वळू हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलाला कायद्यात अडकविले गेले.

सन 1960 च्या प्राणी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22(2) नुसार केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने अशा शर्यतीमुळे प्राण्यांचा छळ होतो हे कारण पुढे करत बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. अशी बंदी घालण्यापूर्वी शेतकऱ्यांचे मत विचारात घेतले नसल्याची माहिती देखील समोर आली. भारताचा विचार केला असतात, जेव्हा न्यायालय बंदी घालते तेव्हा संपूर्ण देशांत तो कायदा लागू होतो पण बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये त्या राज्य सरकारच्या कायद्यानुसार बैलगाडा शर्यती चालू आहेत. परंतु महाराष्ट्रातच का बंद असा सवाल उपस्थित केला गेला.

बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागातील मोठे अर्थकारण देखील अवलंबून आहे. गावाच्या जत्रेमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. यामुळे जत्रेत मोठी गर्दी होते. त्यामुळे मोठी उलाढाल होते. शर्यती बंद झाल्यामुळे बैलांच्या संख्येत घट झाली. त्यांच्या किंमती देखील घसरल्या. शर्यतीचे साहित्य तयार करणारे ग्रामीण कारागीर, शर्यती उपयोगी साहित्य तसेच वाहतूक व्यवस्था या सर्वानवर परिणाम झाला. ग्रामीण कारागीर बेरोजगार झाले. महाराष्ट्रात तब्बल 65 हजार नोंदणीकृत बैलगाडा मालक आहेत. यावरून तुमच्या लक्षात येऊ शकते की या स्पर्धा किती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. जवळपास चार ते पाच लाख बैल अशा स्पर्धांसाठी संपूर्णवर्ष संभाळले जातात. जेव्हा अशा स्पर्धा आयोजित होतात तेव्हा खास देशी वंशाचे गाई- बैल जगविले जातात. त्यांच्या प्रजाती टिकतात. पण सरकारने बंदी घातल्यामुळे अनेक प्रजाती कमी झाल्या आहेत. पण आता पुन्हा बंदी उठविल्यामुळे शेतकरी राज्यात पुन्हा जोशाने आपल्या बैलासह मैदानात उतरणार आहे.